जागतिकस्तरावर घटलेले कापूस उत्पादन त्याच्या परिणामी वाढती मागणी यामुळे कापूस दरात तेजी अनुभवली जात आहे. अकोट बाजार समितीत विठ्ठल झामरे (रोहणखेड) यांच्या कापसाला ५९१५ रुपये क्विंटलचा उच्चांकी दर मिळाला. १६ मार्च रोजी त्यांच्या कापसाची खरेदी करण्यात आली. त्याच दिवशी कापूस दर ५७७५ ते ५९७० रुपये क्विंटल या रेंजमध्ये होते. अकोट बाजार समितीत सरासरी कापसाची आवक ४५९० क्विंटलची आहे. कापूस दरातील या तेजीच्या लाभापासून मात्र शेतकरी वंचितच आहेत. कारण, बहुतांश शेतकऱ्यांनी आर्थिक गरजा भागविण्याकरिता यापूर्वीच आपल्या कापसाची विक्री केली. वर्धा बाजार समितीच्या माध्यमातून नऊ जिनिंग व्यावसायिक खरेदी करतात. या ९ केंद्रांवर आतापर्यंत ६६ हजार ४०० क्विंटल कापसाची आवक झाल्याची नोंद आहे. वर्धा तालुक्यात कापसाला ५ हजार ते ५७०० रुपये क्विंटलचा दर मिळाला. कापसाची साठवणूक केलेल्या शेतकऱ्यांना मात्र या माध्यमातून चांगला परतावा मिळणार आहे.
थेट खरेदीमुळे बुडतोय सेस
वर्धा बाजार समितीच्या नियंत्रणात ९ केंद्रावर कापूस खरेदी होत आहे. या व्यापाऱ्यांकडून ४० लाख रुपयांचा सेस तर शासनाला १.०५ टक्के देखरेख शुल्क मिळते. पणन संचलनालयाने दोन खरेदीदारांना थेट खरेदी परवाने दिल्याने त्यांच्याकडून दिला जाणारा भाव, खरेदी केलेला कापूस, सेस व देखरेख शुल्क याविषयी माहितीच मिळत नसल्याची चर्चा आहे.


No comments:
Post a Comment